Thursday 14 March 2019

आठवी ब च्या मुलांचं शंकासमाधान... !!शेवटचा भाग!!

काही वर्षांपूर्वीची घटना. एका शाळेत गेलो. सातवी, आठवी आणि नववीच्या मुलांशी त्यांच्या एकंदरीतच आरोग्यविषयक प्रश्नाबाबत चर्चा केली. मुलींबद्दल आकर्षण असणारं हे वय. सेक्सशी संबंधीत अनेक प्रश्न मुलांनी विचारले. बरेचसे प्रश्न मला अनपेक्षित होते. त्यामुळे मी थोडा अस्वस्थच झालो. विचार केला की, मुलांच्या मनात मुलींबद्दल आकर्षण असतं हे ठीक आहे. पण, काही मुलांनी भलतेच प्रश्न विचारले असंही वाटून गेलं. एड्ससारख्या लैंगिक संबंधातून लागण होणाऱ्या आजाराबद्दल जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता मी समजू शकतो. पण 'पूर्वीच्या काळात, राजा महाराजांचे चार ते पाच बायकांसोबत विवाह व्हायचे, मग त्यांना एड्स न होण्याचं कारण काय?, समलिंगी संभोग केल्याने काय होऊ शकतं?, मुलींची मासिक पाळी असताना तिच्याशी संभोग केल्यास काय होईल? या प्रश्नांची योग्य उत्तरे तर मी दिली पण एवढ्या लहान वयात मुलांच्या मनात असे प्रश्न असतात याचं मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्याकडे असणाऱ्या चिकित्सक बुद्धीचं कौतुक करावं की त्यांचं मन शाळा-अभ्यास सोडून भलतीकडेच भरकटतंय यासाठी त्यांची कानउघाडणी करावी हा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला.
काहीही असो, या मुलांच्या मनात अभ्यासाशिवाय असं पण काही चालू असतं, याची कल्पना त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आई-वडिलांना आणि शिक्षकांना असली पाहिजे, हा विचार मनात घेऊन मी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेलो. त्यांनी पालक आणि शिक्षकांची एकत्रित मिटिंग घ्यावी अशी विनंती केली. मुख्याध्यापक असं काही करण्यासाठी उत्सुक नव्हते. मी त्यांना डायरीत चिकटवलेले त्यांच्याच शाळेतील, मुलांच्या हस्ताक्षरातील प्रश्न वाचायला दिल्यानंतर, मुख्याधापक अवाक झाले. त्यांनी दुसऱ्याच दिवशी मिटिंग ठरवली. त्या मिटिंगमध्ये पालकांशी बरीच चर्चा झाली.
काही आई-वडिलांनी विचारलं, की शाळेतून इतक्या लहान वयापासून सेक्स एजुकेशन देण्याची खरचं गरज आहे का? या प्रश्नाचं उत्तर 'हो' असंच आहे. लोकांमध्ये एक फार मोठा गैरसमज आहे की, सेक्स एजुकेशन देणं म्हणजे सेक्स कसं करतात हे शिकवणं. हा अत्यंत चुकीचा समज. मुलां-मुलींच्या मनात किशोरवयीन वयातच लैंगिक भावना उत्तेजित होतात. या विषयाच्या संदर्भात त्यांच्या मनात प्रश्नांचा महासागर उसळत असतो. असं होणं निसर्ग नियमाला धरूनच आहे. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचं वेळीच समाधान नाही झालं तर मुलं नको त्या वयात नको ते करून बसतील. त्यांना त्यांच्या शरीरात आणि मनात होणाऱ्या बदलांना कसं हाताळायचं हे त्यांना समजेल अशा उत्तेजित न होणाऱ्या भाषेत समजावून सांगितल्यास त्यांची या बद्दलची उत्सुकता कमी होईल. त्यांचं लैंगिक जीवन अधिक जबादारीचं व्हावं यासाठी Education in Sexuality ची गरज आहे.
हे युग तंत्रज्ञानाचं आहे. आपण स्वतःला आणि आपल्या मुलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवू शकत नाही. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट सारख्या गोष्टीपासून 'त्रास' पण होतो आणि उपयोग पण होतो. या तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग करवून घेण्याचं मोठ्यांनी लहानांना शिकवलं पाहिजे. दहावी-बारावीच्या वेळेस अनेक पालक टीव्ही बंद करून माळ्यावर टाकून देतात. असं करण्याने समस्या सुटणार नाही. मुलांचं अनावश्यक टीव्ही पाहणं बंद करायचं असल्यास आई किंवा वडिलांनी त्यांच्या सोबत बसून तो कोणता कार्यक्रम टीव्हीवर बघतोय त्यात रस घेऊन पहिला पाहिजे. असं करण्याने त्या मुलांशी मैत्री करणं सोपं होईल. त्या वेळेस तुम्ही काय पहायचं आणि काय नाही हे समजावून सांगू शकाल. फक्त येता जाता 'अरे, टीव्ही बंद कर, अभ्यास कर अशा सूचना देऊन काही होणार नाही. पण हे सर्व संयम ठेऊन करण्यासाठी त्यांना 'वेळ' द्यावा लागतो, जो आजकालच्या आई-वडिलांकडे नाही.
- डॉ. किशोर अतनूरकर, नांदेड

No comments:

Post a Comment