Monday 25 March 2019

पकोडे विकणारी नगरसेविका

    कुठलाही नगरसेवक म्हटला की त्याच्या गळयात एक जाडजूड सोन्याची चेन, बोटात तीन-चार अंगठ्या, खादीचे कडक पांढरे शुभ्र कपडे, एक मोठी चारचाकी गाडी आणि अवती भोवती दहा बारा कार्यकर्त्याचा गराडा असं चित्र सहसा आपण बघत असतो, कारण काही मोजके नगरसेवक सोडले तर इतर सर्व याचं ‘कॅटेगिरी’त मोडतात. महिला नगर सेविका असेल तर तिचाही ‘थाट’ बघण्यासारखा असतो. छान भारीची साडी, गळ्यात जाडजूड मंगळसूत्र हातात सोन्याचे ब्रेसलेट, बांगड्या, लॉकेट वगैरे आणि दिमतीला एक आज्ञाधारक ड्रायव्हर व चकाचक चारचाकी.
मात्र वर्धेला एक असंही नगरसेवक जोडपं आहे जे आळीपाळीने मागील 25 वर्षांपासून सतत नगरसेवक असूनही चक्क भाड्याच्या घरात राहतात. त्यांचा मुलगा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतो. आणि उदरनिर्वाहाकरीता हे नगरसेवक इंगोले चौकातील एका कोपर्‍यात हातगाडीवर पकोडे विकतात. हे ऐकून कुणाचाही विश्‍वास बसणार नाही पण हे सत्य आहे.
1995 सालची गोष्ट आहे, वर्धा नगरपरिषदेची निवडणूक जवळ आली होती. विविध पक्ष आपआपल्या उमेदवाराची मोर्चेबांधणी करीत होते. अशातच मालगुजारीपुरातून विनोद लाटकर या तरुणाने आपली उमेदवारी लोक आग्रहास्तव दाखल केली आणि ती सुध्दा अपक्ष. विनोदने उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला तेव्हा तो एका दवाखान्यात कंपौंडरचं काम करत होता. पण सर्वांच्या मदतीला धावून जाणे, लोकांची छोटी मोठी कामे करणे व सगळ्यांशी आपुलकीने व सौजन्याने वागणे या त्याच्या गुणांमुळे परिसरातील लोकांनीच त्याला निवडणुकीला उभं केलं. एवढंच नाही, तर त्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी चक्क वर्गणी गोळा केली गेली. आणि असा हा सर्वांचा लाडका विनोद लाटकर चक्क एका मोठ्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करून भरघोस मतांनी निवडून आला.
त्या निवडून येण्याचं त्याने ‘सोनं’ केलं. वॉर्डातील कामं होऊ लागली. नगरसेवक स्वतः लोकांच्या समस्या समजावून घेण्यासाठी रोज फिरु लागला आणि बघता बघता वॉर्डाचा कायापालट झाला. दरम्यान नगरसेवक झालो म्हणून हुरळून न जाता, विनोदने आपली दवाखान्यातील नोकरी सुरूच ठेवली. त्यात त्यांना कसलाही कमीपणा कधी वाटला नाही. त्यांच्या याच स्वभावाने त्यांना पुन्हा २००० साली नगरसेवक बनवले आणि त्यानंतर २००५ साली त्यांची नगरसेवक पदाची चक्क ‘हॅट्रीक’ झाली.
विनोद लाटकर तीन टर्म नगरसेवक राहूनही जमिनीवरच होते. आता ते दवाखान्याच्या ऐवजी एका हार्डवेअरच्या दुकानात कामं करू लागले. नगरपालिकेतून मिळणार्‍या तुटपुंज्या मानधनावरच समाधान शोधणार्‍या विनोदने कधीही भ्रष्टाचार केला नाही. कंत्राटदारांनी घरापर्यंत आणलेले कमिशनचे पैसे त्यांनी अतिशय नम्रपणे नाकारले. अतिशय वाईट परिस्थितीत दिवस काढल्यावरही सहज मिळणारा पैसा परतवण्यासाठीचं ‘जिगर’ विनोदकडे आहे.
तशीच मोठ्या मनाची बायको विनोदला मिळाली तिने तीन टर्म नगरसेवक असणार्‍या पण भाड्याच्या घरात राहणार्‍या आपल्या जोडीदाराला पसंत केलं. बरं, विनोदच काही छोटं कुटुंब नाही, आई-बाबा, एक विधवा बहीण व तिची दोन मुलं एवढ्या सगळ्यांना विनोद आनंदाने कुठलाही भ्रष्टाचार न करता सांभाळतो.
पुढे २०१० साली विनोदचा वॉर्ड आता तीन वॉर्डाचा मिळून प्रभाग झाला होता आणि महिलांसाठी राखीव सुध्दा आणि यावेळी विनोदची पत्नी शिल्पा लाटकर निवडणुकीला अपक्ष उभी राहिली आणि पुन्हा एकदा प्रस्थापित पक्षांच्या दिग्गज उमेदवारांना पराभूत करून प्रचंड मतांनी विजयी झाली. ही नगरसेवक पदाची चक्क चवथी टर्म. तरीही हे दोघे इमानदार नवरा बायको आपल्या उदरनिर्वाहासाठी पकोडे विकतात तेही चक्क एका हातगाडीवर, कुठलीही लाज न बाळगता.
आता मात्र विनोदला किंवा शिल्पा लाटकर यांना पराभूत करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शिल्पा लाटकर यांना आपली अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं आणि तब्बल पाचव्यांदा लाटकर परिवाराला नगरसेवक पद मिळालं.
२५ वर्षांच्या कार्यकाळात कुठलाही भ्रष्टाचार न करता, कुठलाही कामात पैशाची मागणी न करता, कसलंही कमिशन न घेता घरची परिस्थिती बेताचीच असल्यावरही, आपला व परिवाराचा उदरनिर्वाह फक्त पकोडे विकून चालवणारी ही जोडी बहुदा एकमेव असावी.
- नीरज आवंडेकर, अकोला

No comments:

Post a Comment