Thursday 14 March 2019

आठवी ब च्या मुलांचे शंकासमाधान... llभाग २ll

गेल्या काही वर्षात मी विविध शाळा-कॉलेजात जाऊन आठवीपासून पदवी शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन आणि तरुण मुलांच्या आरोग्यविषयक समस्या घेऊन चर्चा करत आहे. वर्गात फक्त मी आणि मुलं. त्यांच्या मनात मुलीच्या शारीरिक आकर्षणाबद्दल काय वाटतं, त्याविषयी, “ तुमच्या मनात काही शंका असतील तर मला मोकळेपणाने तुम्हाला ज्या भाषेत जमेल त्या भाषेत विचारा, संकोच करू नका. मी तुम्हाला या बाबतीत योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगण्यासाठी आलो आहे. शंका विचारताना तुम्ही कोणत्याही शब्दाचा उपयोग करू शकता. मी तुम्हाला शास्त्रीय भाषेत उत्तर देणार आहे.” मी हे सांगतो. पण, खरी गंमत यानंतरच होते. कारण जवळपास प्रत्येक मुलाला या बाबतीत काही ना काही विचारायचं असतं. पण याविषयीच्या शंका मुलं वर्गात उभं पाहून विचारत नाहीत. तर, कागदावर आपला प्रश्न लिहून, माझ्याकडे देतात. त्या प्रश्नाचं मी जाहीर वाचन करतो, योग्य ते उत्तर देतो.
प्रश्नोत्तराचे असे अनेक कार्यक्रम आजपर्यंत झाले आहेत. आता असं लक्षात येतं की, लैंगिकतेविषयी मुलांना खूप काही विचारायचं असतं. इंग्रजी असो की मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांच्या मनातील प्रश्न विचारण्याची फक्त भाषा वेगळी होती. प्रश्नाचा आशय जवळपास सारखाच. शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या मनात लैंगिकतेशी संबंधित प्रश्न निश्चित असतात; त्यासोबत उंची वाढण्यासाठी मी काय केलं पाहिजे, शरीर पिळदार होण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे असे लैंगिकतेशी संबंधित नसलेले प्रश्न देखील असतात.
हस्तमैथुनाबाबत मुलं खूप प्रश्न विचारतात. हस्तमैथुन करावं का करू नये? किती प्रमाणात केलं तर चालतं? मी प्रत्येक महिन्यात पाच ते सहा वेळेस करतो- चालेल ना? जास्त प्रमाणात केल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात का? दररोज हस्तमैथुन केल्याने कमजोरी येते का? हस्तमैथुनापासून वाचण्यासाठी काय करावं लागेल? दररोज हस्तमैथुन केल्याने पिंपल्स येतात का? मुली हस्तमैथुन करतात का करत नाहीत हे जाणून घेण्याची मुलांना भारी इच्छा असते. त्या उत्सुकतेपोटीदेखील मुलं प्रश्न विचारतात.
हस्तमैथुनाबद्दल काही महत्वाचे मुद्दे, गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मांडणे गरजेचे आहे. मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सालॉजिस्ट डॉ विठ्ठल प्रभू म्हणतात, मुलं आणि मुली (पुरुष आणि स्त्रिया ) दोघेही हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन करण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त (९३ ते ९८ टक्के) तर स्त्रियांमध्ये ते कमी (६० ते ८० टक्के) असते. फक्त किशोरवयीन मुलं किंवा अविवाहित तरुणच हस्तमैथुन करतात असं नव्हे तर काही वेळेस विवाहित पुरुषदेखील हस्तमैथुन करतात. हस्तमैथुनामुळे कमजोरी येते, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, लिंगाचे आकारमान लहान किंवा मोठे होते, लिंग वाकडे होते, शरीरातील वीर्याचा साठा संपून जातो, नंपुसकत्व येतं हे सगळं काही चूक आहे. शास्त्रज्ञ सांगतात, हस्तमैथुनाचा लिंगावर अथवा शारीरिक स्वास्थ्यावर काहीही विपरीत परिणाम होत नाही, उलट हस्तमैथुनाचे काही फायदे आहेत. हस्तमैथुन करणाऱ्याच्या मनात एक प्रकारची अपराधी भावना असते, जी असण्याची गरज नाही.
अमुक इतक्या प्रमाणात हस्तमैथुन केलं तर ते योग्य असं सांगता येत नाही. फक्त अतिरेक व्हायला नको. एखादा मुलगा बाकी काहीच करत नाही, फक्त दिवसभर हस्तमैथुनच करत असेल तर ते वाईट. किशोरवयात आणि तरुणपणी हस्तमैथुन करणं ही एक नैसर्गिक बाब आहे. वाढत्या वयासोबत ते प्रमाण कमी होत असतं. हस्तमैथुन करण्याने काही तोटा नाही पण त्या सोबत येणारं नैराश्य, अपराधीपणाची भावना, मनाची बेचैनी त्रासदायक ठरू शकते. हस्तमैथुनाच्या सवयी पासून सुटका हवी असल्यास मुलांनी शारीरिक व्यायाम करणे, एखादा खेळ, संगीत अथवा चित्रकलेसारख्या छंदाची जोपासना केली पाहिजे.
- डॉ. किशोर अतनूरकर, नांदेड

No comments:

Post a Comment