Monday 25 March 2019

तू खचून जाऊ नकोस...

गावातील अनाथ मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचारातून मूल जन्माला आलं. गावतल्या लोकांसाठी ते एक संकट ठरलं. मात्र, त्याच मुलीला मातृत्वाची जाणीव करून देत दोघांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या त्या शिल्पा आघाव. 
पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. शिल्पा आघाव अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होत्या. विविध वस्त्यांत महिला बालकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांसाठी काम करायचं, त्यांना माहिती द्यायची हे त्यांचं काम. असंच काम सुरू असताना एका ग्रामीण भागात बकऱ्या चारणाऱ्या अठरा वर्षाच्या गतिमंद मुलीला मुलगा झाल्याची माहिती त्यांना मिळाली. घरात अठरा विश्व दारिद्र्य, आई-वडील नाहीत. त्यामुळे तिचा सांभाळ आजवर आजी आजोबांनीच केला होता. एकीकडे कुणाचा आधार नाही, पाठिंबा नाही आणि प्रसंग असा आलेला. पीडीत तरुणीला ते नवजात शिशु नकोसं वाटत होतं. बाळाची स्वच्छता वेळोवेळी होत नसल्याने बाळाला संसर्गजन्य आजार होत होते. एकीकडे बाळ नकोसं होतं तरी दवाखान्यात घेऊन गेले तर बाळाला हिसकावून घेतील अशी भीती. त्यामुळे ती कोणाच्या हातातही बाळाला द्यायची नाही. घरात बाळाला एकटं सोडून बाहेरून कुलूप लावून बकऱ्या चारण्यास निघून जायची. अशातच शिल्पाताईच्या कानावर बातमी आल्याने त्यांनी आधी संबंधित तरुणीचा विश्वास संपादित केला. तिच्या बाळावर सर्वांचंच प्रेम आहे हे तिला पटवून दिलं. तिला सोबत घेऊन बाळावर उपचार सुरू केले. त्यानंतर त्याचे लसीकरण, कपडे घेऊन देत जास्तीत जास्त स्वतःच्या सहवासात ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
आता शिल्पा ताईंचं काम बघून गावातील दानशूर सरसावले. पोषक आहार आणि योग्य देखभालीत वाढणाऱ्या या बाळाचे मोल खूप आहे. तू खचून जाऊ नकोस असा पाठिंबा बाळाच्या आईला देत शिल्पाताईनेच त्याचे नाव अमोल ठेवले. आज अमोल सर्व मुलांमध्ये मिसळतो. रोज अंगणवाडीत जाऊन अभ्यास करतो. आता तो पाच वर्षांचा झाला आहे. आणि त्याला शाळेत घालण्यासाठी शिल्पाताईंचे प्रयत्न सुरू आहेत. आता सामाजिक पाठिंबा मिळत असला तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिल्पाताईंचे मुलींना खंबीर बनवायचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थितीने गरीब, अशिक्षित असले तरी कुणाच्याही छळाला बळी पडू नका. तुम्ही खंबीर व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे बाळकडू या वस्तीतील मुलींना मिळत असल्याने शोषणाचं प्रमाण तिथं फारसं दिसत नाही. आता शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी पाऊल उचललं असून अंगणवाडी कार्यक्षेत्रातील अनेक महिलाही त्यांच्या या मोहिमेत सहभागी होत आहेत. शासकीय योजनांचा लाभ अमोलला मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण समाजात असे अमोल पुन्हा जन्माला येणार नाहीत यासाठीही तरुणींना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं, शिल्पा सांगतात.
शिल्पा आघाव म्हणतात, “मागासवर्गीय वस्तीत शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. अमोलच्या प्रश्‍नावर आवाज उठवताना त्याच्या पुनर्वसनासाठी मी पुढाकार घेतला. यामागील व्यक्तीचाही शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण यश मिळालं नाही. प्रत्येक वेळी असे अमोल आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी तरुण-तरुणींनी सक्षम व्हावं असं मला वाटतं. आता गावातील महिलांची हळूहळू साथ मिळू लागली आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य शिक्षण यावर काम सुरू आहे.”


- चेतना चौधरी, धुळे

No comments:

Post a Comment