Thursday 14 March 2019

प्रकाशाच्या वाटेवर...

सातारा येथील श्रीकांत शहा, अविनाश बी.जे. यांचं अंधांसाठी काम सुरू होतं. १९८७ मध्ये त्यांनी अंधांसाठी हस्तलिखित शुभेच्छा कार्ड तयार करुन निधी जमा केला. त्यावेळी हेमा सोनी यांनी शुभेच्छापत्रं तयार करून करमाळा (जि. सोलापूर) सारख्या ग्रामीण भागातून ६ हजार रुपयांचा निधी मिळवून दिला होता. त्यावेळी खरंतर हेमा जेमतेम १५-१६ वर्षांच्या. पण, यातूनच त्यांना अंधांसाठी काहीतरी चांगलं काम करावं, हे ध्येय मिळालं. पुढं सातारा येथील श्रीकांत शहा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर व्यवसायाकडे न वळता त्यांनी पूर्ण वेळ समाजकार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. ‘सत्यशोध’ संस्थेच्या माध्यमातून प्रथम नर्मदा बचाव आंदोलन, कोयना जीवन हक्क अभियानातून सक्रिय सहभाग घेतला. हे करत असतानाच त्यांनी अंधांसाठी काम सुरू ठेवलं.
सत्यशोध अंध सहयोग संस्थेची स्थापना अविनाश बी.जे यांनी केली. मात्र, २००० साली त्यांचं निधन झालं. तरीही संस्थेचं काम थांबलं नाही. सोनी आणि इतर कार्यकर्त्यांनी संस्थेचं काम पुढं चालू ठेवलं.
हेमा सोनी अंध मुला-मुलींच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी सतत धडपड करत असतात. त्यांनी शाळांमध्ये अंध विद्यार्थ्यांना शिक्षण कसं देता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. सर्वसामान्यांच्या बरोबरीने अंधांना एकत्र शिक्षण द्यावे, अशी एकात्मिक शिक्षणाची योजना राबविण्याचा आग्रह त्यांनी १९८७ पासून धरला होता. पुढे ही संकल्पना केंद्र शासनाने स्वीकारून अंधांसाठी एकात्मिक शिक्षण सुरू केलं. हे त्यांच्या संघर्षाचेच यश.
पुढं संस्थेने अंध मुलांच्या रोजगारासाठी द्रोण तयार करण्याची मशीन घेतली. त्यामुळे अंध मुलांमुलींना रोजगार मिळाला. तसेच संस्थेतर्फे भात सडणी यंत्र, विविध सिझनच्या वस्तू विक्रीस उपलब्ध करून दिल्या. शहरात रोजगारासाठी स्टॉलची जागा उपलब्ध करून देणे, अंधांना रोजगारासाठी आटाचक्की, किराणा मालाचे दुकान काढून दिले आणि त्यांना स्वावलंबी बनवले.
सातारा जिल्ह्यात २००५ सालापूर्वी एकाही अंध व्यक्तीला नोकरी नव्हती. जिल्ह्यात अंधांचा अनुशेष भरला जात नव्हता. यामुळे त्यांनी अंधांना नोकरी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे सातारा जिल्हा नंतर महाराष्ट्रभर अपंग अनुशेष भरती सुरू झाली. अनेक अंध युवक-युवतींना सरकारी नोकरी मिळाली.
अंध मुला-मुलींची लग्नं होत नाहीत. त्यामुळे सोनी यांनी अंधांची लग्न लावून देण्याचा उपक्रम सुरू केला. काही अंध जोडप्यांची सत्यशोधक पद्धतीने लग्न लावून दिली. या लग्नांमध्ये अनेक आंतरजातीय विवाहांचा समावेश होता. हे सर्व करत असताना या अंध जोडप्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी समाजातून वस्तू रुपात व आर्थिक सहभाग संस्था मिळवते.
आता त्यांनी सातारा जिल्ह्यात फिरती शाळा सुरू केली आहे. या शाळेतील शिक्षक आठवड्यातून एक दिवस अंध मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण देतात. अंध मुलांना ब्रेललिपीचं ज्ञान दिलं जातं. त्यांना ब्रेल लिपीतील पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात. या कामाशिवाय त्या अंध युवक-युवतींना 'एमएससीआयटी'सारखे व्यवसायपूरक प्रशिक्षण, अंधत्त्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणे, सरकारी योजनांच्या सवलती मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतात. तसेच अंध मुलांमध्ये आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी भावना निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी ट्रेकिंग, सहलीचं आयोजन केलं जातं.
हेमा सोनी यांचा रचनात्मक आणि परिणामकारक काम करण्यावर भर आहे. पैसे देऊन मदत करण्यापेक्षा व्यक्तीला स्वावलंबी बनवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. अंधांना मदत करण्याबरोबरच त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन, कोयना जीवन हक्क अभियान, वांग-मराठवाडी धरणग्रस्त कृती समितीच्या कार्यकर्त्या म्हणून काम केलं आहे. हेमा सोनी यांना चित्रकलेची आवड आहे. त्यामुळेच अनेकांच्या आयुष्यातील चित्रात रंग भरण्याचे काम करत आहेत.
हेमा सोनी  (संपर्क क्र.- ९२२५६४५९५६)
- रोहित आवळे, सातारा

No comments:

Post a Comment