Thursday 14 March 2019

लातूरचे विद्यार्थी पोहोचले विधिमंडळात!

राज्याचे विधानसभा अधिवेशन म्हणजे सगळा झेड सिक्युरिटीचा कारभार. मात्र या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला प्रवेश मिळणे तसे अवघडच. पण लातूर जिल्ह्यातील निवळी नावाच्या छोट्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना २०१६ च्या ऑगस्ट महिन्यात चक्क विधिमंडळात चालू असलेले कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.
या सहलीविषयी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप जाधव सांगतात, “विद्यार्थ्यांना आम्ही शाळेत नागरिकशास्त्राचे धडे देतच असतो. पण राज्याचा कारभार कसा चालतो? विधानसभा, विधानपरिषदेचे कामकाज कसं चालतं? आपले प्रतिनिधी प्रश्न कसं मांडतात? हे सगळं प्रत्यक्ष पाहायला मिळावं, असं आम्हांला वाटत होतं. त्यासाठी आम्ही नियोजन बैठका घेतल्या, प्रधान शिक्षण सचिवांशी संपर्क साधून विनंती केली. एके दिवशी तत्कालीन प्रधान सचिव नंदकुमार यांनी विधिमंडळ दौऱ्याची परवानगी देणारं पत्र दिलं आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्याची चांगली संधी आम्हांला मिळाली.”

दिनांक ३ ऑगस्ट २०१६ रोजी निवळी शाळेची सहल निघाली. आम्ही रात्री मुक्कामासाठी बेलापूरला थांबलो. चार ऑगस्टचा दिवस खूपच महत्त्वाचा होता. सकाळी स्वच्छ आंघोळ करून, शाळेचा इस्त्री केलेला गणवेष आणि गळ्यात ओळखपत्रे अडकवून विद्यार्थी तयार झाले. पुन्हा बसमध्ये बसून ते विधिमंडळाकडे निघाले आणि वाटेत मुलांसाठी एक मोठे सरप्राईझ होते- पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाचे. पुढचा दिवसभराचा कार्यक्रम गच्च भरलेला असल्याने सकाळी १० वाजताच मुलांना एका प्रशस्त हॉटेलमध्ये श्रीखंड- पुरी, पुलाव- गाजर हलवा असं सुंदर भरपेट जेवण देण्यात आलं. त्या हॉटेलचा चकचकाट, छानसे पदार्थ, हात धुवायला फिंगर बोल हे कित्येक विद्यार्थ्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं. बच्चेकंपनी या जेवणावर जाम खुश झाली.
त्यानंतर बस थेट विधिमंडळात पोहोचली. विधानसभेत जाण्याआधी सर्वांची काटेकोर तपासणी झाली आणि सूचना देऊन सर्वांना आत सोडण्यात आलं. विधानसभेच्या दालन क्रमांक ४११ मध्ये हे विद्यार्थी पोहोचले. तिथल्या प्रेक्षक गॅलरीत संपूर्ण कामकाज दिसेल, अशा प्रकारे उंच जागी त्यांची बसण्याची सोय करण्यात आली. प्रत्येक तीन विद्यार्थ्यांमध्ये एक सर अथवा मॅडम यांना बसविले गेले. विद्यार्थी अतिशय कुतुहुलाने कामकाज पाहत होते. हळू आवाजात शिक्षकांना प्रश्न विचारीत होते. शिक्षक त्यांना अधिवेशन म्हणजे काय, विधानसभा- विधानपरिषदेतला फरक, आमदारांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगत होते.
त्या दिवशी मुलांना विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार नारायण राणे आणि इतरही आमदार पाहायला मिळाले. टीव्हीवर बघायला मिळणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात पाहायला मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित कौतुक होते. त्यानंतर विधानभवनाबाहेर आल्यावर लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी विद्यार्थ्यांची खास भेट घेतली. विधानसभा आवडली का, पुढील नियोजन असे प्रश्न विचारून शाळेला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आमदारांसोबत फोटोही काढून घेतले. दरम्यान इतरही काही आमदारांनी मुलांना भेटून शाळेचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, लातूर

No comments:

Post a Comment