Monday 4 March 2019

हरवलेल्या गीताला अंगठ्याच्या ठशाने मिळाला 'आधार’

जानेवारी महिन्यातला दिवस. धुळे शहरातलं संस्कार बालगृह. तब्बल साडेतीन वर्षानंतर गीताची भावाशी गाठ पडली होती. गीता निरोप घेणार म्हणून मुलं, शिक्षक सगळेच भावूक झाले होते.
13 जुलै 2015 चा दिवस. अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला गतिमंद मुलगी सापडली. जळगाव पोलीस आणि केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या मदतीनं तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं. स्वतः चं नाव गीता किशन असं तिनं सांगितलं. नंतर बालकल्याण समितीमार्फत तिला धुळ्यातल्या संस्कार बालगृहात पाठवण्यात आलं.
गीतासाठी भाषा हा मोठा अडसर होता. वैद्यकीय तपासणीत ती गतिमंद असल्याचं निष्पन्न झालं. गीताची ओळख पटवायची कशी? हा मोठा प्रश्नच होता. तिचं आधारकार्ड काढण्याचा निर्णय झाला. तिच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. तिचं आधारकार्ड लिंक झालं. कार्डाची प्रत काढण्यात आली. गीताचं मूळ नाव सुशीला पिंगुवा क्रिश्ना चंपीला असल्याचं आणि ती झारखंडमधल्या पश्चिमी सिंहभूम जिल्ह्यातल्या कुमारडुंगी इथली असल्याचं समजलं.


यानंतर संस्कार बालगृहाचे संचालक सुनील वाघ, महिला आणि बालकल्याण समितीचे सदस्य प्रा.डॉ.सुदाम राठोड, अ‍ॅड.अमित दुसाणे, वैशाली पाटील यांनी देवपूरचे पोलीस निरीक्षक दत्ता पवारांच्या मदतीने झारखंड पोलिसांशी संपर्क साधला. तिचे पालक आदिवासी पाड्यातील रहिवासी असल्यानं आर्थिक अडचणी होत्या. त्यासाठी मदतीचे हात पुढे आले. धुळे पोलिसांसह महिला आणि बालकल्याण समितीनं कागदपत्रांची पडतळणी केली. त्यानंतर धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात गीताला तिच्या भावाच्या आणि झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

-कावेरी परदेशी, धुळे

No comments:

Post a Comment